वर्डप्रेस की ब्लॉगर?

तुम्हाला ब्लॉग तयार करायचा आहे का? पण कोणता ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म वापरावा हे कळत नसेल. ब्लॉग कुठे सुरु करावा? मोफत असणाऱ्या ब्लॉगरवर कि पैसे लागणाऱ्या वर्डप्रेसवर? हा ब्लॉग वाचल्यावर तुमच्या मनातील सर्व प्रश्न दूर होतील.

मी याआधी टॉप ५ ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म या विषयावर वर एक ब्लॉग लिहला आहे. त्यातल्या त्यात वर्डप्रेस (WordPress) आणि ब्लॉगर (Blogger) हे सर्वाधिक पसंतीचे ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म आहेत. आजच्या ब्लॉगमध्ये आपण या दोघांचीच तुलना करणार आहोत.

ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म निवडतांना खालील काही मुद्दे अभ्यासले पाहिजे :

१. वापरायला सोपे : तुम्ही सर्वच फार टेक्निकल असाल असे नाही. त्यामुळे ब्लॉगिंग प्लॅटफॉर्मची निवड करतांना तुम्हाला तो सहजरित्या हाताळता यायला हवा. जेणेकरून भविष्यात तुम्हाला काही अडचण यायला नको.

२. खर्च : ब्लॉग सुरु करतांना काही मोफत पर्याय उपलब्ध असले तरी अनेकदा काही गोष्टींसाठी खर्च करावाच लागतो. यामुळे तुम्ही जो प्लॅटफॉर्म निवडणार आहेत त्याला भविष्यात किती खर्च येईल हे आधीच पाहिलेले योग्य राहील.

३. मदत (Support) : तुम्ही निवडत असणाऱ्या ब्लॉगिंग प्लॅटफॉर्मसाठी सपोर्ट उपलब्ध आहे कि नाही हे आवश्य तपासून घ्या. कारण बऱ्याचदा काही तंत्रक अडचणी उद्धभल्या आणि योग्य मदत उपलब्ध नसेल तर तुमची गैरसोय होऊ शकते.

४. उत्पन्नाचे मार्ग : तुम्ही जरी हौस म्हणून ब्लॉग सुरु करत असाल तरी त्यातून २ पैसे मिळाले तर कोणाला नको असेल. त्यामुळे तुमची निवडत असणारा ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म तुम्ही मॉनिटाईज करू शकाल का हे तपासून घ्या. ब्लॉगवरून पैसे कमावण्यासाठी Google AdSense सारखे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. गुगल ऍडसेन्स अकाउंट कसे सुरु करावे यावर मी याआधीच सविस्तर ब्लॉग लिहलेला आहे.

यासोबतच सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन, अपडेट्स, नवनवीन तंत्रज्ञान याविषयी देखील माहिती करून घेणे गरजचे आहे.

आज आपण ब्लॉगरसोबत वर्डप्रेस.ऑर्गची तुलना करणार आहोत. वर्डप्रेसचे २ प्रकार आहेत.

१. wordpress.com २. wordpress.org 

यापैकी पहिले वर्डप्रेस.कॉम हे एक प्रकारे ब्लॉगर सारखेच आहे. दुसरे वर्डप्रेस.ऑर्ग ओपन सोर्स आहे.

आधीच सांगितल्याप्रमाणे वर्डप्रेस आणि ब्लॉगर हे दोन्ही प्लॅटफॉर्म सर्वाधिक पसंतीचे आहेत. त्यातल्या त्यात BuiltWith च्या रिपोर्ट नुसार वर्डप्रेस हा जगात सर्वाधिक वापरला जाणारा CMS (कन्टेन्ट मॅनेजमेंट सिस्टीम) आहे. आपण गुगल ट्रेंड्सद्वारे देखील पाहू शकतो कि वर्डप्रेस कायमच ब्लॉगरला वरचढ राहिलेलं आहे.

वर्डप्रेस काय आहे?

वर्डप्रेस हे एक मुक्त स्रोत (Open Source) सॉफ्टवेअर आहे. ज्याच्या मदतीने तुम्ही सहजपणे ब्लॉग, वेबसाईट किंवा ई-कॉमर्स स्टोअर देखील तयार करू शकता. जगातील ३४% वेबसाईट या वर्डप्रेसवर आहेत.

वर्डप्रेस हे मोफत असले तरी त्यावर ब्लॉग किंवा वेबसाईट तयार करण्यासाठी डोमेन आणि होस्टिंग घेणे गरजेचे असते. सुरवातीला हे थोडं टेक्निकल वाटत असलं तरी नंतर हे फार सोपं आहे. वर्डप्रेस शिकण्यासाठी इंटरनेटवर अनेक स्रोत उपलब्ध आहेत.

येथे क्लिक करून तुम्ही वर्डप्रेससाठी स्वस्त आणि मस्त होस्टिंग घेऊ शकता.

ब्लॉगर काय आहे?

ब्लॉगर हे गुगलचे एक उत्पादन आहे. १९९९ साली Pyra Labs याने ब्लॉगर सुरु केले होते. २००३ साली गुगलने हे विकत घेतले.

ब्लॉगर हा पूर्णपणे मोफत ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म आहे. यात तुम्ही सबडोमेनवर तुमचा ब्लॉग तयार करू शकता. परंतु जर स्वतःच्या डेमनवर हवा असेल तर तुम्हाला डोमेन विकत घ्यावे लागेल.

१) मालकी

ब्लॉगर ही गुगल मार्फत दिली जाणारी मोफत सेवा आहे. परंतू यावरील कंटेंटची सर्व मालकी ही गुगल कडे असते. यासाठी तुम्हाला गुगलच्या अनेक नियम व अटी मान्य कराव्या लागतात. तसेच गुगल त्याला वाटेल तेव्हा ही सेवा बंद करू शकते. याउलट वर्डप्रेस हे सेल्फ होस्टेड असल्याने आपल्याला हव्या त्या होस्टींगवर ठेवता येते. यामुळे यावरील कंटेंटची मालकीही पुर्णपणे आपल्याकडे असते.

२) नियंत्रण (Control)

ब्लॉगरवर ठरावीकच पर्याय उपलब्ध असून यात काही बदल हवे असल्यास ते शक्य नाही. ब्लॉगरसाठी मोजक्याच थीमस उपलब्ध आहेत. अनऑफीशील उपलब्ध असणार्‍या थीमस देखील हव्या तितक्या उपयोगी नाहीत. याउलट वर्डप्रेस ओपन सोर्स असल्याने यात आपण हवे ते बदल करू शकतो. एखादे फीचर हवे असल्यास लाखो फ्री व पेड प्लगइन्स उपलब्ध आहेत. टेक्निकल माहीती असेल तर स्वतःचे हवे तसे प्लगइन्स तयार करणे देखील वर्डप्रेसमध्ये शक्य आहे.

३) सुरक्षा

ब्लॉगर सोबत तुम्हाला गुगलची मजबूत सुरक्षा मिळत असल्याने चिंता करण्याची गरज नाही. वर्डप्रेस सेल्फ होस्टेड असल्यामुळे याची जबाबदारी आपल्यावर येते. सध्या तरी अनेक होस्टींग कंपन्या या सुविधा मोफत अथवा अतीशय अत्यल्प मोबदल्यात देतात. यासाठी काही प्लगइन्स देखील उपलब्ध आहेत. यामुळे याची खुप चिंता करण्याची गरज नाही.

४) खर्च

ब्लॉगर ही गुगल मार्फत दिली जाणारी मोफत सेवा आहे. यासाठी आपल्याला एक रूपयाही मोजावा लागत नाही. वर्डप्रेस होस्टींगसाठी आपल्याला काही पैसे मोजावे लागतात. प्रीमीयम थीम्स, प्लगइन्स हवे असल्यास हा खर्च वाढू शकतो. परंतु हा खर्च तुमच्या रोजच्या चहाच्या खर्चापेक्षा देखील कमी असू शकतो.

५) मदत (Support)

ब्लॉगरसाठी विशेष असा काही सपोर्ट उपलब्ध नसला तरी वर्डप्रेससाठी फोरमच्या माध्यमातून मोफत सपोर्ट उपलब्ध आहे. वर्डप्रेस फोरमसोबतच होस्टिंग व थीमस कंपन्या स्वतःचा वेगळा सपोर्ट देखील देतात.

६) समुदाय (Community)

वर्डप्रेस हा एक ओपन सोर्स प्लॅटफॉर्म असल्याने यावर सक्रियपणे काम करणारा एक मोठा समुदाय आहे. याच्याशी तुम्ही वर्डप्रेस फोरमच्या माध्यमातून संपर्क साधू शकता. या सक्रिय कम्युनिटीमुळे वर्डप्रेस दिवसेंदिवस झपाट्याने लोकप्रिय होत आहे. वर्डकॅम्पच्या माध्यमातून तुम्ही या समुदायात तुमचा सक्रिय सहभाग नोंदवू शकता.

७) वापरायला सोपं

वर्डप्रेस वापरायला इतर CMS पेक्षा सोपे आहे. तुम्ही टेक्निकल नसला तरी तुम्ही वर्डप्रेस सहजरित्या शिकू शकता. यासाठी अनेक ऑनलाईन मोफत स्त्रोत (Resources) उपलब्ध आहेत.

८) सर्च इंजिन ऑप्टीमाइझेशन (SEO)

ब्लॉगर गुगलचे प्रोडक्ट असल्याने सर्च इंजिन रंकिंगमध्ये फायदा होतो हा समज मला तरी खोटा वाटतो. उलट वर्डप्रेसमध्ये सर्च इंजिन ऑप्टीमाइझेशनसाठी विविध प्लगइन्स उपलब्ध असल्याने खूप टेक्निकल माहिती नसली तरी सर्च इंजिन ऑप्टीमाइझेशन करता येते.

९) उत्पन्न

ब्लॉगिंगद्वारे अनेक जण लाखो रुपये कमवत आहेत. त्यामुळे ब्लॉगिंग हा एक करियरचा मार्ग होतोय. ब्लॉगर हे गुगलचे प्रोडक्ट असल्यामुळे त्यावर गुगल ऍडसेन्सच्या मदतीने तुम्ही पैसे कमावू शकता. याचप्रमाणे वर्डप्रेसवर संपूर्णपणे तुमचे कंट्रोल असल्याने तुम्ही गुगल ऍडसेन्ससोबतच इतर कोणत्याही ऍड नेटवर्कच्या जाहिराती लावू शकता.

१०) भविष्य

२३ ऑगस्ट १९९९ रोजी Pyra Labs या कंपनीने ब्लॉगर सेवा सुरु केली. २००३ मध्ये गुगलने Pyra Labs विकत घेतले. तेव्हापासून यात कोणतेही विशेष अपडेटस करण्यात आले नाही. याउलट वर्डप्रेस ओपन सोर्स असल्याने वेळोवेळी अपडेट व नविन फीचर्स येत असतात. याचमुळे वर्डप्रेस जगातील सर्वात पंसतीचा सीएमएस ठरला आहे. केवळ ब्लॉगीगसाठी मर्यादित असणारे वर्डप्रेस आता बिझनेस, ई-कॉर्मस यासाठी देखील वापरण्यात येत आहे. जगातील जवळपास ३०% वेबसाईटस वर्डप्रेसवर आहेत.

यासोबतच तुम्ही माझा टॉप ५ ब्लॉगिंग प्लॅटफॉर्मची तुलना करणारा ब्लॉग येथे क्लिक करून वाचू शकता.

वरील माहीतीवरून तुम्हाला तुमच्या प्रश्‍नांची उत्तरे मिळाली असतीलच. वर्डप्रेस की ब्लॉगर हे ठरवत असतांना सर्वप्रथम आपली आवश्यकता जाणून घ्या. माझा स्वतःचा ब्लॉग जरी वर्डप्रेसवर असला तरी ब्लॉगरवरही माझ्या १५ हून अधिक वेबसाईटस आहेत. त्यामुळे ब्लॉगर वापरूच नये असे नाही. यानंतर तुमचे काही प्रश्न असल्यास कॉमेंट करू शकता. हा ब्लॉग तुम्हाला उपयोगी वाटल्यास नक्की शेयर करा. धन्यवाद!

– तुषार भांबरे
आवडल्यास नक्की शेअर करा:

६ वर्ष डिजिटल मीडियामध्ये कामाचा अनुभव आहे. 'जनशक्ति' या दैनिकात डिजिटल हेड या पदावर काम करत आहे सोबतच टेक ड्रिफ्ट सोल्युशन्स हि वेब डेव्हलपमेंट व डिजिटल मार्केटिंग कंपनी सुरु केली आहे. वर्डप्रेस, नवनवीन गॅजेट्स, सोशल मीडिया व तंत्रज्ञान याविषयी विशेष आवड आहे.

14 thoughts on “वर्डप्रेस की ब्लॉगर?”

Leave a Comment